उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका ढाब्यामध्ये थंड पोळ्या(चपात्या) दिल्याने संतापलेल्या ग्राहकाने थेट ढाबा मालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथा येथील बस स्टॅण्डसमोर असणाऱ्या ढाब्यावर हा प्रकार घडला आहे. एका तरुणाने रागाच्याभरात आपल्या परवाना असणाऱ्या पिस्तुलने ढाबा मालकावर गोळीबार केला. ही सर्व घटना मागील आठवड्यामध्ये बुधवारी रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

ढाब्याचे मालक अवदेश यादव यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री दोन तरुण ढाब्यावर आले होते. त्यांनी रात्री साडे अकराच्या सुमारास जेवणाची ऑर्डर दिली. जेवण समोर आल्यानंतर त्यांनी मागवलेल्या पोळ्या थंड असल्याबद्दल तक्रार केली. त्यावरुन हे तरुण आणि ढाबा मालक यादव यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद सुरु असतानाच त्या दोघांपैकी एकाने आपली पिस्तुल काढून यादव यांच्यावर गोळीबार केला. गोळी यादव यांच्या उजव्या मांडीला लागल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.

आणखी वाचा- भररस्त्यात तरुणावर हल्ला करुन हत्या; लोकांनी व्हिडीओ शूट केला पण मदतीला नाही आले

घडलेल्या प्रकारानंतर ढाब्यावर एकच गोंधळ उडाला. यादव यांना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रीया करुन मांडीमधील गोळी बाहेर काढण्यात आली. सध्या यादव यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुनिल कुमार सिंग यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. “अमित चौहान आणि कासुताब सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांची नाव आहे. दोघांकडून दोन परवाना असलेल्या पिस्तुल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दोघांविरोधात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम ३८६ आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर दोघांना हजर करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील सुनावणीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,” असं सुनिल कुमार सिंग यांनी सांगितलं. हा सर्व प्रकार कोतवाली नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे.