अमेरिका आणि भारत सरकारच्या प्रणालीसह परदेशातील १००हून अधिक कंपन्या आणि संस्था त्याचप्रमाणे मौल्यवान सॉफ्टवेअर डाटा आणि व्यापारविषयक गोपनीय माहिती हॅक केल्याचा आरोप अमरिकेच्या कायदा विभागाने चीनमधील पाच नागरिकांवर ठेवला आहे.

संगणक हॅक केल्याप्रकरणी चीनच्या पाच नागरिकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे अमेरिकेचे डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल जेफ्री रोसेन यांनी बुधवारी जाहीर केले. त्याचप्रमाणे हॅकर्सना मदत केल्याप्रकरणी मलेशियातील दोन नागरिकांनाही दोषी ठरविण्यात आले आहे.

मलेशियातील नागरिकांना रविवारी अटक करण्यात आली तर चीनच्या नागरिकांना फरारी घोषित करण्यात आल्याचे अमेरिकेच्या कायदा विभागाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे. रोसेन यांनी चीन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

चीनमधील या नागरिकांकडून संगणक हॅक करण्याचा झालेला प्रकार आणि सायबर हल्ला रोखण्यासाठी कायदा विभागाने उपलब्ध असलेल्या प्रत्येक

पर्यायाचा वापर केला. संगणक हॅक केल्याचा फटका अमेरिका आणि परदेशातील १००हून अधिक कंपन्यांना बसल्याचे आरोपांमध्ये म्हटले आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेण्ट, कॉम्प्युटर हार्डवेअर, दूरदळणवळण, समाजमाध्यम आणि व्हिडीओ गेम कंपन्या, ना नफा संघटना, विद्यापीठे, विचारवंत, परदेशी सरकार, लोकशाही समर्थक राजकीय नेते आणि हाँगकाँगमधील कार्यकर्ते यांना लक्ष्य करण्यात आले आहे.