अमेरिकी राजदूत रिचर्ड वर्मा यांचे स्पष्टीकरण
पाकिस्तानला आम्ही एफ १६ विमाने विकण्याचे ठरवले असले तरी त्या देशाने या विमानांचा तसेच आर्थिक मदतीचा वापर दहशतवादाच्या विरोधात करणे अपेक्षित आहे, असे स्पष्टीकरण अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला एफ १६ विमाने विकत देण्याची अधिसूचना काढल्यानंतर भारताने काल राजदूत रिचर्ड वर्मा यांना बोलावून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आज त्यांनी सीएनएन-आशिया बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पाकिस्तानला लष्करी किंवा नागरी मदत हा अमेरिकेच्या धोरणातील नवा भाग नाही; गेली अनेक वर्षे आम्ही अशी मदत केली आहे, पाकिस्तानात अनेक दहशतवादी गट काम करतात व त्यामुळे त्या देशात तसेच इतरत्र दहशतवादी हल्ले होतात. त्यामुळे पाकिस्तानने ही मदत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने मोकळे रान दिले आहे, ते प्रकार थांबले पाहिजेत. अमेरिकेने पाकिस्तानला ७० कोटी डॉलर्स किमतीची आठ एफ १६ विमाने विकण्याचे जाहीर केले आहे. यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संरक्षण समतोल फार ढळणार नसला तरी भारताने हेडलीच्या जाबजबाबानंतर मुंबई हल्ल्यातील संबंधितांवर कारवाईसाठी पाकिस्तानला पुरावे देऊन निरूत्तर करण्याचे प्रयत्न चालवले असताना त्या देशाला मदत देण्याचा निर्णय अयोग्य आहे असे भारताला वाटते. या प्रकरणी भारत ओबामा प्रशासनाकडे आणखी पाठपुरावा करणार आहे.
मोदी सरकारची प्रशंसा करताना वर्मा यांनी सांगितले की, भारतात दोन वर्षांत बरीच प्रगती झाली आहे. वाढते शहरीकरण व हवामान बदल ही दोन मोठी आव्हाने देशासमोर आहेत.
केरी लॉजिस्टिक्सचे जॉर्ज येव यांनी सांगितले की, भारत- चीन यांच्यातील संघर्ष हाताबाहेर जाऊ नये अशी आशा आहे. १९६२ मधील युद्धाच्या जखमा अजून भारतीय जनमानसावर असल्या तरी चीन हे युद्ध जवळपास विसरला आहे.

भारताच्या प्रतिक्रियेबाबत पाकिस्तानला आश्चर्य, निराशा

इस्लामाबाद – भारत हा संरक्षण सामग्रीचा ‘सर्वात मोठा आयातदार’ असून त्याचे शस्त्रागार ‘फार मोठे’ आहे, असा युक्तिवाद करून, पाकिस्तानला एफ-१६ विमाने विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबाबत आपल्याला ‘आश्चर्य व निराशा’ वाटते, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
ही विमाने मिळाल्यामुळे देशाची दहशतवादाशी लढण्याची क्षमता वाढेल, या ओबामा प्रशासनाने केलेल्या मीमांसेचा पाकिस्तानने पुनरुच्चार केला.
भारत सरकारने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे आम्ही आश्चर्यचकित व निराशही झालो आहोत. त्यांचे सैन्य व शस्त्रास्त्रांचा साठा बराच मोठा असून ते संरक्षण सामग्रीचे सगळ्यात मोठे आयातदार आहेत, असे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांच्या उत्तरात परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात सांगितले.
एफ-१६ विमानांच्या विक्रीच्या संदर्भात पाकिस्तान व अमेरिका हे दहशतवादाला आळा घालण्यामध्ये निकट सहकार्य करतात, असे निवेदनात म्हटले आहे.
पाकिस्तानला आठ अण्वस्त्रसक्षम एफ-१६ लढाऊ विमाने विकण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी भारताने अमेरिकी राजदूत रिचर्ड वर्मा यांना पाचारण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.