माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
१९८४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी हत्या केल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ‘खून का बदला खून से लेंगे’ असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी ‘शिख फॉर जस्टिस’चे कायदेशीर सल्लागार गुरपतवंतसिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने बच्चन यांना समन्स बजावले आहे. गेल्यावर्षी या खटल्यातील प्रमुख साक्षीदार जगदीश कौर यांनीही या प्रकरणात अमिताभ यांचेही नाव घेण्याची मागणी केली होती.