करोना संकटात सध्या सर्वांचं लक्ष करोना लसीकडे लागलं असतानाच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मॉडर्ना करोना लस घेतलेल्या डॉक्टरला अ‍ॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांनी मॉडर्नाची करोना लस देण्यात आली होती.

करोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर मला लगेचच त्रास जाणवू लागला. मला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि ह्रदयाची धडधडही वाढली होती असं डॉक्टर होसेन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं आहे. मॉडर्ना लसीमुळे त्रास झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे.

बोस्टन मेडिकल सेंटरचे प्रवक्ते डेव्हिड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “डॉक्टर होसेन यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना आपातकालीन विभागात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर काही काळासाठी देखरेखेखाली ठेवण्यात आलं आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आला”.

गेल्या आठवड्यात १७ डिसेंबरला एफडीएच्या सल्लागार समितीने १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मॉडर्ना लस देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता. करोना लसीमुळे होणारे फायदे आणि संभाव्य धोकेही यावेळी सांगण्यात आले होते. यासंबंधी मतदानही करण्यात आलं. यावेळी २०-२० मतं मिळाली. यानंतर १८ डिसेंबरला मंजुरी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेत सध्या करोना लस मोहीम सुरु आहे. यामध्ये ब्रिटनच्या फायझर (Pfizer) आणि जर्मनीच्या बायोएनटेक (BioNtech) लसीव्यतिरिक्त मॉडर्ना लसीचाही वापर केला जात आहे. मॉडर्नाची लस ९५ टक्के सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात एफडीए फायझर, बायोएनटेक यांच्या लस घेतल्यानंतर त्रास झालेल्या पाच जणांबद्दल सध्या माहिती घेत असल्याचं सांगितलं होतं.