विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर यांना अर्ल्फेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हवामान बदल आणि आर्थिक विकासाबाबत केलेल्या संशोधनासाठी रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्सेसने सोमवारी (दि.८) या दोघांच्या नावाची नोबेलसाठी घोषणा केली.


विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रोमर हे दोघे अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेचे नागरिक आहेत. नोर्दहॉस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे येल विद्यापीठातूनच घेतले आहे. त्यांनी प्रतिष्ठित मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.

या दोन्ही अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना पुरस्काराच्या रुपाने ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळणार आहेत. या दोघांना १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे एका औपचारिक कार्यक्रमात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कारांची सुरुवात करणारे अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यंदा साहित्यातला नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय नोबेल अकॅडमीकडून घेण्यात आला आहे. गेल्या ७० वर्षांत पहिल्यांदाच साहित्यातला नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.