अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. तसंच निवडणुकांचा प्रचारही आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बुधवारी निवडणुकीपूर्वी पहिली ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ पार पडली. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळालं.

यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूवरून चीनवर निशाणा साधला. “चीनमुळे करोना विषाणू आला. जर चीननं सर्वांना योग्यवेळी योग्य माहिती दिली असती तर करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला नसता,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी बायडेन यांना चीनमधील खरी आकडेवारी माहित नसल्याचंही म्हणत त्यांनी बायडेन यांना भारत आणि रशियाची आकडेवारी पाहण्याचाही सल्ला दिला. यापूर्वी अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची तुलना भारतातील करोना चाचण्यांच्या संख्येशी केली आहे.

… तर दहा लाख जणांचा मृत्यू

“जर बायडेन सरकारमध्ये असते तर दोन लाख नाही तर दहा लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असता. लवकरात लवकर करोनावरील लस तयार करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत,” असं ट्रम्प यावेळी म्हणाले. “करोनाच्या कालावधीत आम्ही उत्तम काम केलं आहे. आम्ही पीपी किट, मास्क तयार केले. आम्ही व्हेंटिलर्संचंही उत्पादन केलं. आम्ही लसीपासून केवळ काही आठवड्यांच्या अंतरावर आहेत. सध्या करोनामुळे होणारा अमेरिकेतील मृत्यूदरही कमी झाला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ट्रम्प यांच्यावर विश्वास नाही – बायडेन

बायडेन यांनी करोना लसीवरून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. “‘ट्रम्प यांनी शास्त्रज्ञांवर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी दबाव टाकला. मला ट्रम्प यांच्यावर अजिबात विश्वास नाही,” असं बायडेन यावेळी म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी करोना महासाथीचा योग्यरित्या सामना करण्यास ट्रम्प अपयशी ठरले असल्याचाही आरोप केला. “ट्रम्प प्रशासनानं या महासाथीच्या आजाराशी लढण्यासाठी कोणतीही तयारी केली नव्हती. या धोक्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा निष्काळजीपणाचा होता आणि त्यामुळे अमेरिकेतील लाखो लोकांचे प्राण गेले,” असा आरोपही बायडेन यांनी केला.

“करोनाची साथ जेव्हा पसरत होती तेव्हा ट्रम्प यांचं लक्ष शेअर बाजारावर होतं. ट्रम्प यांनी राज्यांना लॉकडाउन उठवण्यास भाग पाडलं. ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात खराब राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांना गोल्फ कोर्समधून बाहेर पडून काम करण्याची गरज आहे,” असंही ते म्हणाले. यावेळी बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर आरोप करत त्यांच्या कार्यकाळात अमेरिका सर्वात कमकुवत, गरीब, विभाजित आणि हिंसक देश झाल्याचा म्हटलं. तसंच ट्रम्प आपल्या कोणत्याही आश्वासनाचं पालन करत नसल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं.