करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असल्याचे दृश्य होते. ऑक्सिजनची मोठी कमतरता देशभरात जाणवत होती. कित्येक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. त्यावेळी परदेशातील अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आले होते. तब्बल ४० देशांनी भारतात करोना काळात मदतीचे साहित्य पाठवले. अमेरिकेतर्फे ही मोठी मदत भारताला देण्यात आली.

अमेरिकेने आतापर्यंत भारताला करोनाशी लढण्यासाठी ५०० मिलियन अमेरिकन डॉलर (अंदाजे ३ लाख १९ हजार ५५० कोटी रुपये)ची मदत पुरविली आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसने बुधवारी दिली. लवकरच इतर देशांनाही ८० लाख लसींचे वितरण करणार असल्याचे अमेरकिकडून सांगण्यात आले.

“अमेरिकेने आजवर भारताला करोनाकाळात ५०० मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक मदत पुरविली आहे. यामध्ये अमेरिकन संघराज्य, राज्य सरकार, अमेरिकन कंपन्या, खासगी संस्था आणि अमेरिकन नागरिकांचे योगदान आहे,” असे व्हाईट हाऊसच्या सचिव जेन पसाकी यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार सदस्यांना सांगितले.

करोना जास्त प्रभाव असलेल्या दक्षिण आशियाई देशांना मदत देण्याचे काम आता सुरू असल्याचे बायडेन प्रशासनने सांगितले. “आम्ही ऑक्सिजन, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वस्तू आणि मास्क, करोनाचे निदान करणारे किट आणि औषधे सात हवाई विमानांमधून पाठवली आहेत”.

८० लाख करोनाच्या लसींमध्ये ६० लाख लसी या अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या आहेत तर २० लाख लसी या नविन मंजूर झालेल्या तीन लसींपैकी आहेत ”असे पसाकी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

“भारतीय लोक ज्या परिस्थितीत होते त्याचा आमच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आमच्याकडे या गोष्टींबद्दल अधिक साठा असेल,” पसाकी म्हणाल्या.