चीन, रशिया, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्सचा विरोध

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इराणवरचे संयुक्त राष्ट्र निर्बंध पूर्ववत केले असून शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. उर्वरित जगाने अमेरिकेचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले  आहे.

ट्रम्प प्रशासनाने अमेरिका व इराण यांच्यात झालेला अणुकरारही २०१५ मध्ये  रद्द केला होता. सर्वंकष कृती कार्यक्रमातील वचनांचे पालन इराणने केलेले नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले होते. सुरक्षा मंडळाने इराणवरील शस्त्रास्त्र निर्बंध वाढवण्यास यापूर्वी नकार दिल्याचा सूड अमेरिकेने उगवला आहे. आता इराणवर शस्त्र निर्बंधासह इतर प्रतिबंध लागू होणार आहेत. अमेरिकी प्रशासन याबाबत सोमवारी अध्यादेश जारी करणार आहे. इतर १३ देशांनी अमेरिकेच्या या कृतीस विरोध केला असून निर्बंधांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे. ट्रम्प यांनी २०१८ मध्ये इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेतली तेव्हाच अमेरिकेने असे निर्बंध लावण्याचा अधिकार गमावला आहे असे सदस्य देशांचे म्हणणे आहे. रशिया व चीनने अमेरिकेच्या या कृत्यास विरोध क ेला असून अमेरिकी मित्र राष्ट्रांचाही ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयास विरोध आहे. सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षांना ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या सुरक्षा मंडळ सदस्यांनी पत्र पाठवले असून ट्रम्प यांची घोषणा कायदेशीर नसल्याचे व त्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे.