अमेरिकेतील मेरिलँड येथे १७ वर्षांच्या मुलाने शाळेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली. सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला. या गोळीबारात १६ वर्षांची मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठच्या सुमारास शाळा सुरु झाली. काही क्षणातच १७ वर्षांचा ऑस्टिन रॉलिन्स हा देखील शाळेत पोहोचला. त्याच्याकडे हँडगन होती. शाळेत प्रवेश केल्यावर त्याने १६ वर्षांच्या मुलीवर गोळीबार केला. यात ती मुलगी गंभीर जखमी झाली. या गोळीबारात १४ वर्षांचा मुलगा देखील जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे तैनात असलेले शाळेतील सुरक्षा अधिकारी ब्लेन गस्कील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ऑस्टिनच्या दिशेने गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला. जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रेट मिल्स या शाळेत ही घटना घडली.

गोळीबार करणाऱ्या ऑस्टिनचे जखमी मुलीशी पूर्वी प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ऑस्टिनचा मृत्यू सुरक्षा अधिकाऱ्याच्या गोळीबारात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्याने गोळीबार का केला, हे देखील अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेनंतर अमेरिकेतील ‘गन कल्चर’ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अमेरिकेत कायद्यानुसार १८ वर्षांवरील कोणालाही बंदूक बाळगण्याची सूट आहे. यामुळे विद्यार्थी बंदूक घेऊन येतात. फेब्रुवारीमध्येही फ्लोरिडात एका शाळेतील गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात अमेरिकेतील विविध भागांमध्ये शाळेत गोळीबाराच्या १७ घटना घडल्या आहेत.