अमेरिकेतील सर्व व्यवहार सुरु करा अशी भूमिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा मुद्यावर भर देत आहेत. ‘करोना व्हायरसमुळे जास्त मृत्यू झाले किंवा नागरिक आजारी पडले तरी अमेरिकन जनतेने त्यांचे दैनंदिन कामकाज सुरु करावे’ असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

एरिझोना प्रांतातील फोनिक्स शहरामध्ये ते बोलत होते. महिन्याभरानंतर वॉशिंग्टनबाहेर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. करोना व्हायरसविरोधात आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. करोना व्हायरसविरोधात व्हाइट हाऊसने एक टास्क फोर्स बनवली आहे. यात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स विसर्जित करण्यात येणार आहे.

अमेरिकेत करोना व्हायरसमुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे. पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या मुद्दावर ठाम आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ७१ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे.

करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा
करोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘अमेरिका आता करोना व्हायरसविरुद्ध लढाईच्या पुढच्या टप्प्यात आहे. हा सुरक्षित टप्पा असून, हळूहळू काही गोष्टी सुरु होतील’ असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी अमेरिकन नागरिकांचे आभार मानले व असंख्य लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा केला. मागच्या एका आठवडयात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली नाही तसेच मृत्यू सुद्धा कमी झाले आहेत त्यामुळे ट्रम्प यांनी करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेहऱ्याला मास्क न बांधता डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मास्क फॅक्टरीचा दौरा
सध्या फेस मास्क अत्यंत महत्वाचा आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी चेहऱ्याला मास्क बांधणे आवश्यक आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित याचा विसर पडला असावा. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी चेहऱ्याला मास्क न बांधताच एरिझोनामधील न्यू मेडिकल मास्क फॅक्टरीचा दौरा केला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एरिझोना प्रांतामधून मताधिक्क्य मिळेल अशी त्यांना आशा आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन नागरिक सध्या प्रवास करणे टाळत आहेत. एरिझोना प्रांतातील फोनिक्स शहरामध्ये दुपारी दाखल झाल्यानंतर ट्रम्प यांनी हनीवेल इंटरनॅशनल फॅक्टरीला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी या फॅक्टरीमध्ये N95 मास्क बनवले जात आहेत. करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना सुरक्षा उपकरणाची कमतरता निर्माण झाल्याने हनीवेल इंटरनॅशनल फॅक्टरीत एन ९५ मास्क बनवण्याचे काम सुरु आहे.