करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानग्या दिल्या आहेत. मात्र, या लसींचा नागरिकांवर दुष्परिणाम होताना दिसत आहे. विशेषतः अमेरिकेत या घटना घडल्या आहेत. अमेरिकेत काही जणांना लस घेतल्यानंतर त्रास होत असल्याचे समोर आल्यानंतर आणखी एक अशीच घटना घडली आहे. करोनाच्या लसीकरणानंतर एक नर्सची पत्रकार परिषदेतच प्रकृती बिघडली. त्यानंतर ही नर्स चक्कर येऊन कोसळली.

अमेरिकेत फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जात आहे. शनिवारपासून लसीकरणाला सुरूवात झाली असून, काही जणांवर लसीचा दुष्परिणाम होत असल्याचे समोर आलं आहे.

अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चित्तानुगा रुग्णालयात एका नर्सवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालयात नर्स असलेल्या टिफनी डोव्हर यांना फायझर बायोएनटेकची लसीचा पहिला डोस देण्यात आला. डोस घेतल्यानंतर टिफनी या माध्यमांशी बोलत होत्या.

माध्यमांशी बोलत असताना टिफनी यांना चक्कर आल्यासारखं झालं. त्यानंतर माफ करा, मला चक्कर आल्यासारखं होतंय असं त्या म्हणाल्या. नंतर चालू लागल्या. याचवेळी अचानक तोल जाऊन त्या कोसळल्या. मात्र, आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं. तोपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सीडीएसने दिल्या महत्त्वाच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लस घेतल्यानंतर नागरिकांवर लसीचे दुष्परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनने (रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र अर्थात सीडीएस) तातडीनं पावलं उचलत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. ज्या व्यक्तींना लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे त्रास सुरू झाला आहे. त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊ नये, असं सीडीएसनं स्पष्ट केलं आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला अॅलर्जीपासून संरक्षण करणारे औषध देण्यात आले आणि त्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासारखी परिस्थिती उद्भवल्यास या प्रकरणाला गंभीर समजले जाईल. ज्या व्यक्तींना लसीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना लसीकरणापासून दूर ठेवण्याचे निर्देश सीडीएसने दिले आहेत.