१५० पेक्षा अधिक तरुणींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली अनेक तरुण मुलींचे लैंगिक शोषण करण्याच्या प्रकरणामध्ये अमेरिकेतील लॅरी नासर या माजी कलंकित डॉक्टरला ४० ते १७५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मागील दोन दशकापासून नासर अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता.

नासर या डॉक्टरची शिकार बनलेल्या १५० पेक्षा अधिक तरुणींनी साक्ष दिल्यानंतर न्यायाधीशांनी हा निकाल दिला. ‘मी आत्ताच तुमच्या डेथ वॉरंटवर सही केली’ असे न्यायाधीश रोसेमारी एक्युलिना यांनी निर्णय देताना म्हटले. आपण पुन्हा तुरुंगातून बाहेर येण्यासाठी लायक नसल्याचे लॅन्सिंग, मिशिगनमधील न्यायालयात न्यायाधीशांनी आदेश देताना सांगितले.

याबाबतची शेवटीची साक्ष रॅचल डेनहॉलेंडरने दिली. तिने सर्वात प्रथम सार्वजनिक स्वरूपात नासरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. ज्या वेळी मी फक्त १५ वर्षांची होते, त्या वेळी माझे लैंगिक शोषण करण्यात आले. नासरने माझ्या वेदनेमध्ये लैंगिक आनंद शोधला असे रॅचलने सांगितले.