अमेरिकेने पाकिस्तानातील बलुचिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा प्रमुख ठार झाल्याच्या घटनेत सार्वभौमत्वाची पायमल्ली व एफ १६ विमाने देण्यास नकार या घटनांनी संबंध बिघडलेले असताना या देशांच्या अधिकाऱ्यांनी ताणल्या गेलेल्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. अमेरिकी शिष्टमंडळात अफगाणिस्तान व पाकिस्तान कामकाजाचे राष्ट्रीय सुरक्षा मंडळातील वरिष्ठ संचालक व पीटर लव्हॉय व अफगाणिस्तानव पाकिस्तानविषयक विशेष दूत रिचर्ड ओलसन यांचा समावेश होता. अमेरिकी शिष्टमंडळ सकाळी येथे आले व त्यांनी नागरी व लष्करी नेतृत्वाशी चर्चा केली. लव्हॉय यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अजिज व परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांची भेट घेतली. सरताज अजिज यांनी अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला असून, ड्रोन हल्ल्यात केवळ सार्वभौमत्वाचाच नव्हे तर संयुक्त राष्ट्रांच्या आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध या कारणांमुळे बिघडले असल्याचे त्यांनी अमेरिकी शिष्टमंडळास सांगितले. यापुढे पाकिस्तानात प्रवेश करून ड्रोन हल्ले केले तर त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या इच्छेला आणखी धक्का बसेल असा इशारा अजिज यांनी दिला.