भारताला अवकाशामधून धोका जाणवत असल्यामुळेच त्यांनी अँटिसॅटेलाइट किंवा उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची चाचणी केली असावी असं सांगत अमेरिकेच्या पेंटागॉननं भारताची बाजू घेतली आहे. मार्च २७ रोजी भारतानं उपग्रह विनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आणि असा मान मिळवणारा अमेरिका, रशिया व चीननंतरचा चौथा देश ठरला.

भारताच्या या चाचणीचं देशात उत्साहात स्वागत करण्यात आलं, मात्र अमेरिकेनं यामुळं अवकाशात होणाऱ्या कचऱ्याचं व धोक्याचं कारण पुढे करत नाराजी व्यक्त केली. मात्र, आता अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक कमांड कमांडर जनरल जॉन हेटन यांनी भारताची बाजू घेतली आहे. “भारतानं केलेल्या या चाचणीचा विचार करताना प्रथम हा विचार करायला हवा की भारतानं हे पाऊल का उचललं असेल. आणि याचं उत्तर असंच असावं की अवकाशामधून त्यांच्या राष्ट्राला काही धोका असल्याचं त्यांना वाटत असावं. त्यामुळे अवकाशामधल्या धोक्यापासून देशाचं रक्षण करणारी क्षमता आपल्याकडे असावी असं भारतावा वाटलं असावं,” हेटन यांनी अमेरिकी सिनेटच्या लष्करी समितीला सांगितलं आहे.

अवकाशामध्ये कचरा निर्माण करणारी क्षेपणास्त्र चाचणी भारतानं का केली असा प्रश्न सिनेट सदस्यांनी विचारल्यावर हेटन यांनी हे उत्तर दिलं. भारताच्या चाचणीनंतर नासानं ही अत्यंत भयंकर गोष्ट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या क्षेपणास्त्र चाचणीमुळे अवकाशामध्ये या कचऱ्याच्या ४०० वस्तू फिरत असून त्यांच्यापासून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रांना धोका असल्याचं नासानं म्हटलं होतं. अवकाशामध्ये कसा वावर करावा याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायानं काही नियम घालून द्यावेत अशी सूचना हेटन यांनी केली आहे.

सिनेट सदस्य टीम कैन यांनी हा प्रश्न उपस्थित करताना चीननं २००७मध्ये केलेल्या चाचण्यांचा संदर्भ दिला. चीनच्या चाचणीमुळे कचऱ्याच्या एक लाख वस्तू अवकाशात तयार झाल्याचे व त्यातल्या अनेक आजही धोकादायक असल्याचे कैन म्हणाले. सोविएट रशियाच्या काळातल्या परंतु आता कार्यरत नसलेल्या एका सॅटेलाईटची अमेरिकी सॅटेलाईटशी टक्कर होता होता वाचली होती याची आठवणही कैन यांनी करून दिली. जर अवकाशामध्ये सॅटेलाईट्समुळे ट्रॅफिक जाम होणार असेल तर आपण काय विचार करायला हवा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भारत हा काही शत्रूपक्ष नाही तर मित्रपक्ष आहे अशी पुस्ती जोडत कैन यांनी अवकाशाचा वापर करताना कुठली आव्हानं आपल्या समोर असतील याचा विचार करायला हवा अशी सूचना केली आहे. मात्र या निमित्तानं भारताच्या चाचणीची दखल घेतानाच भारताला ही चाचणी का करावी लागली या अंगानंही अमेरिकेत चर्चा होताना दिसत आहे.