अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरणात बदलाचे संकेत देत भारतीयांना दिलासा दिला आहे. ग्रीन कार्डसाठी लॉटरीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या ‘स्टेट ऑफ युनियन अॅड्रेस’मध्ये सत्तेत आल्यावर केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. जवळपास ८० मिनिटे त्यांनी भाषण केले. अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिक आणि विरोधक डेमोक्रेटिक पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. चीन आणि रशिया अमेरिकेची अर्थव्यवस्था, हितसंबंध आणि मुल्यांसाठी आव्हान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प इमिग्रेशन धोरणाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे भारतीयांचे लक्ष लागले होते.

अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी दरवर्षी हजारो एच-१बी व्हिसाधारक अर्ज करतात. ‘एच १ बी’ व्हिसा लॉटरीद्वारे दिला जातो. ट्रम्प यांनी ही पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अकुशल लोकांनाही अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळू शकत होते. आता याऐवजी गुणवत्तेच्या आधारेच व्हिसा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ट्रम्प यांनी चेन मायग्रेशनवरही निर्बंध आणणार असल्याचे सांगितले. सध्या एखादा व्यक्ती त्याच्या नातेवाईकांना अमेरिकेत आणू शकत होता. आता यावर निर्बंध येतील. आता ती व्यक्ती फक्त पती किंवा पत्नी आणि मुलांनाच सोबत अमेरिकेत आणू शकेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. जी व्यक्ती कुशल आहे. समाजात ते योगदान देऊ शकतात आणि जे अमेरिकेवर प्रेम करु शकतात, त्यांनाच व्हिसा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी आयसिस आणि दहशतवादावरही भाष्य केले. आम्ही जगातून आयसिसचा खात्मा करणारच अशी ग्वाही मी देतो. १ वर्षानंतर अमेरिकी आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने इराक व सीरियातील १० टक्के भागातून आयसिसला हद्दपार केले आहे, असे त्यांनी भाषणात सांगितले. तर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, उत्तर कोरियात अत्यंत क्रूरतेने जनतेचे शोषण सुरु आहे. आम्ही उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.