जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना प्रस्ताव

वृत्तसंस्था, दावोस

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा  एकदा काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या येथील बैठकीसाठी आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी भेटीवेळी ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीच्या प्रस्तावाचा पुनरूच्चार  करतानाच काश्मीरमधील परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमवेत प्रसारमाध्यमांशी बोलताना  ट्रम्प म्हणाले,की आमच्यासाठी व्यापार व सीमा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर इम्रान खान यांनी सांगितले की, अफगाणिस्तानचा मुद्दा आमच्यासाठी चर्चेत महत्त्वाचा आहे. या पत्रकार परिषदेनंतर उभय नेत्यात चर्चा झाली.

इम्रान खान यांचा उल्लेख माझे मित्र असा करून ट्रम्प म्हणाले, की काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची आपली तयारी आहे. अध्यक्ष ट्रम्प हे फेब्रुवारीत पहिल्यांदाचा भारत दौऱ्यावर येत असून त्या वेळी ते काश्मीर मुद्दा उपस्थित करतील अशी पाकिस्तानला आशा आहे.

ट्रम्प म्हणाले, की भारत व पाकिस्तान यांच्यात जे काही चालले आहे त्यावर आमचे लक्ष आहे. जर आमची मदत होणार असेल तर आम्ही काश्मीर प्रश्नी मध्यस्थीस तयार आहोत. काश्मीरमधील परिस्थितीवर आमचे लक्ष आहे, पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमवेत येथे उपस्थित राहणे हा माझा सन्मानच आहे.

फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर जाणार आहात तर त्या वेळी पाकिस्तानलाही भेट देणार का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले,की आम्ही आता येथे दावोस येथे भेटलोच आहोत. त्यामुळे पाकिस्तानला जाणार नाही किंबहुना तशी गरज वाटत नाही. आमचे संबंध भक्कम आहेत. आजच्याइतकी अमेरिकेची पाकिस्तानशी जवळीक कधीही नव्हती, हीच मोठी गोष्ट आहे.

इम्रान खान यांनी सांगितले, की पाकिस्तान भारत यांच्यातील संघर्ष हा पाकिस्तानसाठी मोठा प्रश्न आहे. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशीच आमची भूमिका आहे, कारण अमेरिकेशिवाय दुसरा कुठलाही देश या प्रश्नात मदत करू शकत नाही.

भारताने ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अनेकदा दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पाकिस्ताननेही नेहमीच काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय मुद्दय़ावर मांडण्याचे प्रयत्न केले असून जम्मू काश्मीर हा भारताचा एकात्म भाग असून त्याचा विशेष दर्जा काढून घेण्याचा मुद्दा हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची तयारी फ्रान्समधील बियारित्झ येथे जी ७ बैठकीच्यावेळी गेल्यावर्षी ऑगस्टमध्येही दर्शवली होती, त्यावर भारताने काश्मीर हा भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याने त्यावर त्रयस्थ देशाने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट केले होते. इम्रान खान यांनी २०१८ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची ट्रम्प यांच्याशी ही तिसरी भेट होती.