26 February 2021

News Flash

बायडेन यांचा ‘हा’ निर्णय लाखो भारतीयांचं स्वप्न करणार पूर्ण

ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारतीयांनाही बसला होता फटका

(फोटो सौजन्य एएफपी आणि रॉयटर्स)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जो बायडेन यांनी भारतीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये (स्थलांतर धोरणांमध्ये) मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय. बायडेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर बोलताना एक नवीन कायदा तयार करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या कायद्यामुळे एक कोटी १० लाख अप्रवासी नागरिकांना म्हणजेच कायमस्वरुपी अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीयांना स्थानिक म्हणून दर्जा मिळण्याबरोबरच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार आहेत. यात लाखो भारतीयांचाही समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील कोट्यावधी अप्रवासी नागरिकांवर देश सोडून जाण्याची टांगती तलवार होती. मात्र अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले असून त्यामध्ये या स्थलांतर धोरणांमधील बदलांचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

बायडेन यांनी जारी केलेल्या नवीन आदेशामुळे कायदेशीर कागदपत्र नसतानाही अमेरिकेत वास्तव्य करत असणाऱ्यांना फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये अशा लोकांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे. त्यापैकी पाच लाख नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. बायडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील वास्तव्य परवाना हा गुणवत्तेवर अवलंबून असेल असा नवा बदल या धोरणांमध्ये केला होता. ही गुणवत्ता वय, माहिती, नोकरीच्या संधी आणि नागरी कर्तव्य या मुद्दय़ांवर आधारित असंही सांगण्यात आलं होतं. पूर्वी इंग्रजी भाषेची माहिती आणि नागरी कर्तव्य या दोन मुद्यांवरच कायम वास्तव्याचा परवाना दिला जायचाय. मात्र आता ट्रम्प यांनी केलेले बदल रद्द करण्यात आलेत.

काय असणार अटी?

नवीन कायद्यानुसार एक जानेवारी २०२१ पर्यंत अमेरिक राहणाऱ्या लोकांची तपासणी केली जाईल. यामध्ये जे लोकं अमेरिकेतील नागरी कर्तव्य योग्य पद्धतीने बजावत आहे, कर देत आहेत अशा लोकांना अस्थायी पद्धतीने पाच वर्षांसाठी अमेरिकेत राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल किंवा त्यांना थेट ग्रीन कार्डही दिलं जाईल. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सीनेटर बॉब मेंडज आणि लिंडा सैंचेज यांनी या नवीन कायद्यासंदर्भातील कामही सुरु केलं आहे.

इतरही मोठे निर्णय

बायडेन यांच्या या नवीन बदलांमुळे अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना याचा मोठा फायदा होणार आहे. अधिकृत नागरिकत्व मिळाल्यास अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करत असलेल्या भारतीयांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटले. याशिवाय बायडेन यांनी मुस्लीम राष्ट्रांवर घातलेली बंदीही उठवली आहे. त्याचबरोबर बायडेन यांनी सात मुस्लीमबहुल देशांमधील व्हिजा प्रक्रियाही सुरु केली आहे. ट्रम्प यांनी २०१७ पासून ही प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 2:02 pm

Web Title: us president joe biden to strike down immigratin policy of donald trump regime 5 lakh indians will get benefit scsg 91
Next Stories
1 ‘हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब’, बिहारमधील ‘हा’ फोन कॉल होतोय व्हायरल
2 धक्कादायक! मोबाइलसाठी मुलाने मागितले १० हजार रुपये, आईने नकार देताच उचललं टोकाचं पाऊल
3 मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, सर्व मुख्यमंत्री, MP, MLA सर्वांनाच दिली जाणार करोना लस; अशी आहे योजना…
Just Now!
X