क्लिंटन, ट्रम्प यांची आघाडी मात्र कायम

अमेरिकेत अध्यक्षीय उमेदवारीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातील लढतीत व्हेरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स यांनी मायने प्रांतात हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आहे, तर फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रूबियो यांनी रिपब्लिकनच्या प्राथमिक फेरीत प्युटरेरिकोत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला.

सँडर्स यांनी मायनेत विजय मिळवल्याचे वृत्त सीएनएनवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या चर्चेवेळी देण्यात आले. मिशीगनमधील फ्लिंट येथे ही चर्चा झाली. सँडर्स यांनी गेल्या आठवडय़ात कन्सास व नेब्रास्कात विजय मिळवला होता. त्यांनी आज क्लिंटन यांचा मायने प्रांतात पराभव करताना ६४.३ टक्के मते घेतली तर क्लिंटन यांना ३५.५ टक्के मते मिळाली. सँडर्स यांना चांगला पाठिंबा आहे कारण ते जवळच्याच व्हेरमाँट राज्यातील आहेत. असे असले तरी क्लिंटन या डेमोक्रॅटिकच्या उमेदवारीत आघाडीवर आहेत. ट्रम्प हे रिपब्लिकन उमेदवारीत आघाडीवर आहेत.