देशातील नागरी युद्धास तोंड देताना सीरियाचे अध्यक्ष असद यांनी बंडखोरांवर रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप करीत अमेरिकेने या युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने याबाबत मिळविलेल्या माहितीस ब्रिटन आणि फ्रान्स या देशांकडून दुजोरा मिळाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय करारांनुसार रासायनिक शस्त्रे वापरण्यावर बंदी असल्याने अमेरिका या युद्धात उतरण्याच्या निर्णयावर आली आहे.
सीरियामधील बंडखोरांना शस्त्रपुरवठा करण्याची
अमेरिकेची तयारी
 बंडखोरांवर मात करण्यासाठी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याने आता त्या देशातील बंडखोरांना लष्करी मदत, तसेच शस्त्रपुरवठा करण्याची तयारी अमेरिकेने चालविली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होडस् यांनी याबाबत विशेष माहिती दिली. असद यांनी ‘सरीन’सारख्या मानवी मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम करणाऱ्या रासायनिक शस्त्रांचा वापर गेल्या वर्षभरात अनेकदा केला असल्याची बाब पुढे आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने मिळवलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत सुमारे १०० ते १५० जणांना आपली जीव या हल्ल्यांमुळे गमवावा लागला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका माहितीनुसार सीरियातील हिंसाचारात आजवर ९३ हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय असद यांच्याकडे अत्यंत घातक अशा रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा आहे. या पाश्र्वभूमीवर सीरियात बंडखोरांना संरक्षण देण्यासाठी लष्करी कुमक पाठविण्याचा तसेच त्यांना शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दमास्कस विमानतळावर हल्ला
सीरियात सुरू असलेल्या हिंसाचारात बंडखोरांनी दमास्कस विमानतळाला आपले लक्ष्य केले असून, तेथे गोळीबाराच्या दोन फैरी झाडण्यात आल्या. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांनी निषेध केला असून, या हिंसाचाराच्या झळा मुले आणि कुटुंबातील स्त्रियांना बसू नये याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी उभय गटांना केले आहे. बंडखोरांनी एतद्देशीय बनावटीच्या तीन रॉकेटस्चा मारा विमानतळावर केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणाचाही बळी गेला नाही.
नागरी युद्धाची तीव्रता
गेले २७ महिने सुरू असलेल्या सीरियातील नागरी युद्धात ६५०० मुलांसह एकूण ९३ हजार जण मृत्युमुखी पडले आहेत. त्याबरोबरच गेल्या वर्षभरात अनेक मुले आणि कुटुंबांचे क्रूरपणे शोषण करण्यात आले आहे.