वॉशिंग्टन : पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये तसेच त्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळाव्यात, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला असून वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या ताब्यात देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पाकिस्तानने बुधवारी मिग २१ चा वैमानिक वर्धमानला विमान पाडल्यानंतर पकडले होते. वर्धमानच्या सुटकेबाबत चिंता वाटत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात वर्धमान याच्या सुटकेची घोषणा केली होती.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळ ठरावांचे पालन करून दहशतवाद्यांना आश्रय देणे टाळावे व त्यांच्या आर्थिक नाडय़ा आवळाव्यात, असे अमेरिकेने म्हटले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावावाबाबत अमेरिकी प्रतिनिधी गृहाचे नेते स्टेनी होयर यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली असून आताची परिस्थिती हा जैश ए महंमद या संघटनेने केलेल्या हल्ल्याचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. जैश ए महंमद या संघटनेने पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनांवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानात बालाकोट येथे जैशच्या छावणीवर हल्ले केले, नंतर पाकिस्ताननेही हल्ले केले. भारताची दोन जेट विमाने पाडल्याचा व एका वैमानिकाला अटक केल्याचा दावा पाकिस्तानने बुधवारी केला होता.

चीनकडूनही सुटकेच्या निर्णयाचे स्वागत

बीिजग : भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाची सुटका करण्याच्या पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयाचे चीनने शुक्रवारी स्वागत केले. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा करावी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अधिकाधिक सहकार्य करावे, असेही चीनने म्हटले आहे.

वैमानिक सुटकेच्या निर्णयाचे स्वागत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय वैमानिकाची सुटका करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. दरम्यान भारत व पाकिस्तान यांनी संघर्ष चिघळवू नये, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.