भारताने बंदी घातलेल्या इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप टिकटॉकला आता अमेरिकेतही व्यवसाय गुंडाळावा लागू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीने १५ सप्टेंबरपर्यंत विकत घेतला नाही, तर त्यानंतर टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातही टिकटॉक अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय होते. पण गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने देशात व्यवसाय करणाऱ्या चिनी कंपन्यांना जोरदार दणका दिला. यामध्ये टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. भारताने टिकटॉकवर बंदीची कारवाई केल्यानंतर अमेरिकेतही प्रतिनिधी सभागृहाच्या काही सदस्यांनी टिकटॉकवर अशीच कारवाई करण्याची मागणी केली होती.

सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’ला टिकटॉकच्या खरेदीमध्ये रस आहे. त्यासाठी त्यांची बाइटडान्स कंपनीबरोबर बोलणी सुरु आहे. बाइटडान्सकडे टिकटॉकची मूळ मालकी आहे. टिकटॉक अ‍ॅपचा ३० टक्के नाही तर १०० टक्के व्यवसाय खरेदी करावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. या विषयासंदर्भात आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

“मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मायक्रोसॉफ्ट अमेरिकेत टिकटॉकच्या खरेदीबाबत चर्चा सुरू ठेवण्यास तयार आहे,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, १५ सप्टेंबरपर्यंत मायक्रोसॉफ्ट आणि टिकटॉकचा करार अंतिम टप्प्यात पोहोचेल.