अणुबॉम्बचा वापर हा गुन्हाच आहे, इतर देशांना धाकात ठेवण्यासाठी अण्वस्त्रे बाळगणेही चुकीचे आहे, असे मत पोप फ्रान्सिस यांनी हिरोशिमातील अणुहल्ल्यातून वाचलेल्या लोकांबरोबरच्या भावपूर्ण भेटीत व्यक्त केले.

पोप फ्रान्सिस यांनी नागासाकी येथे भेट दिली. त्यांनी हिरोशिमातील पीस मेमोरियल येथे सांगितले की, अगदी कमी कालावधीत या अणुहल्ल्यात सारे काही विध्वंस व मृत्यूच्या कृष्णविवरात नाहीसे झाले, त्यानंतरची भयाण शांतता आजही जाणवते आहे, त्यातून मारल्या गेलेल्या हजारो लोकांचा अव्यक्त आक्रोश आजही ऐकू येतो. अणुबॉम्बचा वापर हा मानवतेविरोधातील गुन्हाच आहे. पण आपले सामायिक घर असलेल्या वसुंधरेचे भवितव्यही त्यामुळे संकटात आले आहे. पोप फ्रान्सिस यांनी तेथे ठेवण्यात आलेल्या श्रद्धांजली पुस्तिकेत स्वाक्षरी करून त्या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. जे लोक या हल्ल्यात मारले गेले, जे वाचले त्यांच्या वेदना मी समजू शकतो असे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. त्या हल्ल्यातून वाचलेल्या वृद्धांनी आपली दर्दभरी कहाणी त्यांना ऐकवली. जपानमधील चार दिवसांच्या भेटीत पोप फ्रान्सिस यांनी अण्वस्त्रमुक्त जगाचा संदेश दिला. हिरोशिमा व नागासाकी या अणुबॉम्ब हल्ला झालेल्या शहरांना त्यांनी भेट दिली.

हिरोशिमात येथील कार्यक्रमातही पोप फ्रान्सिस यांनी जगात अण्वस्त्रांना कुठलेच स्थान नाही असे स्पष्ट केले.

‘कटू स्मृतींनामृत्यूनंतरच पूर्णविराम’

१९४५ मध्ये हिरोशिमातील हल्ल्यात १,४०,०००, नागासाकीतील हल्ल्यात ७४,००० लोक ठार झाले होते याशिवाय अनेक लोकांची आयुष्ये यातनांत लोटली गेली. अणुबॉम्बहल्ला झाला, तेव्हा चौदा वर्षांच्या असलेल्या योशिको काजिमोटो या महिलेने तिचा अनुभव कथन केला, ती म्हणाली की, त्या वेळी लोक एकमेकांच्या जवळून भुतासारखे जात होते. त्या नरकयातनांची कल्पना जगातील कुणीही करू शकणार नाही.  काहींनी सांगितले की, या हल्ल्यांच्या कटू स्मृतींना त्यातून वाचलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतरच पूर्णविराम मिळणार आहे.