देशात जमावाकडून होणाऱ्या हत्यांवरुन सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतरही अशा घटना थांबताना दिसत नाही. मुझफ्फरनगर येथे चोरीच्या संशयातून जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली असून या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे १०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुझफ्फरनगर येथील बिजोपूरा या गावात एका शेतातील इलेक्ट्रिक मोटार चोरी करत असल्याच्या संशयातून जमावाने तीन तरुणांना मारहाण केली. यातील दोन तरुणांनी जमावाच्या तावडीतून सुटका करुन घेत पळ काढला. मात्र, तिसऱ्या तरुणाला पळ काढता आला नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता.  जमावाने त्या तरुणावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याचे समोर आले आहे.

मुझफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक अनंत देव तिवारी म्हणाले, तरुणाची ओळख पटली असून घटनास्थळावरुन एक बाईकदेखील जप्त केली आहे. १०० जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक करु, असे त्यांनी सांगितले. कपिल त्यागी (वय ३५) असे या मृत तरुणाचे नाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

गावातील विकास नामक शेतकऱ्याने स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘तिन्ही तरुण हे चोरटे होते. त्यांनी मोटार चोरण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना हटकले असता त्यांनी मला धमकी दिली. शेवटी मी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थही माझ्या मदतीला आले, असे त्याने सांगितले.