कर्जबुडव्या विजय मल्ल्या याच्याविरोधात तक्रार दाखल करू नका असे सांगत राहुल गांधी यांनी माझ्यावर दबाव आणला होता असा आरोप शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनी केला आहे. विजय मल्ल्या सभ्य माणूस आहे त्याच्याविरोधात तक्रार नको असे राहुल गांधी यांनी बजावले होते असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

एकीकडे मी देश सोडून जाण्याआधी अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटलो होतो असे विजय मल्ल्याने म्हटल्यानंत  काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले. विजय मल्ल्या खोटं बोलत असल्याचे अरूण जेटलींनी म्हटले आहे. तर विजय मल्ल्या पळून जाणार हे अरूण जेटलींना आधीच ठाऊक होते असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आता या वादात शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनीही उडी घेतली आहे.

राहुल गांधी आणि गुलाम नबी आझाद या दोन्ही नेत्यांनी माझ्यावर विजय मल्ल्याविरोधात एफआयआर दाखल करू नये म्हणून दबाव आणला होता. मेरठजवळ शिया वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर विजय मल्ल्याने कब्जा केला होता. याप्रकरणी मला तक्रार दाखल करायची होती. मात्र मी असे करू नये असे मला दोन्ही नेत्यांनी सांगितले आणि माझ्यावर दबाव आणला असा आरोप रिझवी यांनी केला. मी शांत राहिल्याने त्यावेळी विजय मल्ल्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असेही रिझवी यांनी म्हटले आहे. आम्हाला ही अशी माहिती मिळाली होती की शिया वक्फ बोर्डाच्या बळकावलेल्या जमिनीवर विजय मल्ल्या दारूची फॅक्ट्री उघडणार आहे. त्यामुळे आम्ही त्याला तसे न करण्यासंबंधीची नोटीस बजावली होती असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर शिया वक्फ बोर्डाने या फॅक्ट्रीला सील लागावे म्हणून आणि विजय मल्ल्याच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी एफआयआरची प्रक्रिया सुरूही केली होती. मात्र खूपवेळा प्रयत्न करूनही आम्हाला यश आले नाही आणि विजय मल्ल्यावर काही कारवाईही झाली नाही. या संदर्भात आम्ही जेव्हा बड्या अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा मला फोन आला आणि त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत माझे बोलणे करून दिले. विजय मल्ल्या एक सभ्य व्यक्ती आहे त्यांच्या विरोधात तुम्ही जी कारवाई करत आहात ती करू नका असे मला राहुल गांधी यांनी सांगितले असेही रिझवी यांनी म्हटले आहे.