भारतीय पुरातत्त्व विभागाने ४०० वर्षे जुन्या शिवमंदिराकडे जाणारा मार्ग बंद केल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न करत असताना कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही सुरु होती.

रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी ताजमहालच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ धडक दिली. कार्यकर्त्यांच्या हातात हातोडा आणि लोखंडी सळी होती. बसई घाट येथील शिवमंदिराकडे जाणारा मार्ग भारतीय पुरातत्त्व विभागाने बंद केला. या प्रवेशद्वारामुळेच हा मार्ग बंद करण्यात आला असून आता हे प्रवेशद्वार पाडणे गरजेचे आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. शिवमंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे, असे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना माघारी परतण्यास सांगितले. मात्र, पोलिसांशी चर्चा केल्यानंतरही कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. यानंतर कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक पदाधिकारी रवि दुबे, मदन वर्मा, मोहित शर्मा, निरंजन सिंह राठोड, गुल्ला यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

१५ वर्षांपूर्वी ताजमहालच्या पश्चिम प्रवेशद्वाराजवळील सहेली का बुर्ज येथे सत्संग व्हायचे. याशिवाय ताजमहालजवळ दसऱ्यानिमित्त जत्रेचे देखील आयोजन केले जायचे. पण गेल्या १५ वर्षांत हे सर्व बंद करण्यात आले. पुरातत्त्व विभाग हिंदू संस्कृतीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी हटवत असल्याचा आरोप रवि दुबे यांनी केला.