उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील जनपद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्न समारंभामध्ये लोकप्रिय गायिका सपना चौधरीचे गाणं लावलं नाही म्हणून एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरुन दोन गटांमध्ये सोमवारी रात्री वाद झाला. यानंतर दोन्ही गटांनी तुफान हणामारी केली. या हणामारीमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला बुलंदशहरमधील जनपद येथील हायर सेंटर येते दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चारही जणांनी मृत तरुणाला मारहाण केली होती. या चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलाची हत्या बातमी समजल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. शहरातील एका लग्नाच्या हॉल समोर सर्व मारहाणीची प्रकार घडला. वरातीमध्ये नाचताना सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुफान हणामारी झाली.

या प्रकरणामध्ये बुलंदशहरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी लग्नाच्या कार्यक्रमामध्ये दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. याचदरम्यान मृत तरुणाच्या छातीत दुखू लागले आणि तो खाली कोसळला. प्राथमिक अंदाजानुसार त्याला हृदयविकाराचा झटका असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यासंदर्भातील खुलासा होऊ शकणार आहे. पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.