पायउतार झालेले मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या आदेशावरून उत्तराखंड विधानसभेच्या कामकाजाचा अभिलेख पुन्हा लिहिण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.
रावत यांनी घोषित केलेल्या पदयात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजप पुढील आठवडय़ापासून ‘उत्तराखंड बचाव’ यात्रा सुरू करेल अशी घोषणाही पक्षाने केली.
हरीश रावत आणि विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी हातमिळवणी केलेली आहे. रावत यांच्या सांगण्यावरून ज्या दिवशी विधानसभेत गोंधळ झाला त्या, म्हणजे १८ मार्चच्या रात्री स्वत:च्या कक्षात सभागृहाचे कार्यवृत्त पुन्हा लिहवून घेतले. प्रत्यक्षात फेटाळले गेलेले विनियोजन विधेयक सभागृहाने संमत केल्याचे यातून दाखवण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी केला.