ऑक्सफर्ड विद्यापीठ लहान मुलांवर कोविड १९ प्रतिबंधक लशीची चाचणी करणार आहे. लशीत सुधारणा करून दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमधील नव्या करोना विषाणूवर गुणकारी ठरेल, अशी सुधारित लस तयार करण्याचे कामही ऑक्सफर्ड विद्यापीठाने सुरू केले आहे. दक्षिण आफ्रिकेने नव्या विषाणूवर ऑक्सफर्डची लस प्रभावी नसल्याचे सांगून लसीकरण बंद केले होते.

शनिवारी ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे सांगण्यात आले की,  करोना लशीच्या चाचण्या या मुलांवर करण्यात येतील व ही लस त्यांच्यात प्रभावी ठरते की नाही याचा अंदाज घेतला जाईल. ६ ते १७ वयोगटातील मुलांवर लशीच्या चाचण्या करण्यात येणार असून त्यासाठी ३०० स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. त्यातील २४० जणांना कोविडची लस देण्यात येणार आहे तर उरलेल्यांना मेंदुज्वराची लस देण्यात येणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक अँड्रय़ू पोलार्ड यांनी सांगितले की, अनेक मुलांना गंभीर स्वरूपाचा करोना संसर्ग होत नाही. तरी त्यांच्यात कोविड १९ प्रतिकारशक्ती तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यातून मुलांना फायदा होऊ शकतो.

आतापर्यंत पन्नास देशांनी ऑक्सफर्डच्या लशीला मान्यता दिली असून भारतात त्याची निर्मिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड नावाने केली आहे.

इतर कंपन्याही मुलांवर प्रयोग करणार असून फायझर लशीला आधीच अनेक देशांत मंजुरी मिळालेली असताना आता या लशीचे प्रयोग मुलांवर करण्यात येणार आहेत. १२ ऑक्टोबरपासून मुलांना ही लस प्रायोगिक तत्त्वावर दिली जाईल. मॉडर्नाच्या लशीचे प्रयोग मुलांवर डिसेंबरमध्ये सुरू होणार असून ही लस १२ वर्षांपुढील मुलांना दिली जाईल.

भविष्यातील उपाय

मुलांसाठी कोविड ही समस्याच नाही असे सांगून पोलार्ड म्हणाले की, तरी भविष्यात काही परिणाम मुलांवर होऊ लागला तर त्यांच्यात लशीने कोविड १९ प्रतिबंधक शक्ती निर्माण होते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. जे प्रयोग करण्यात येतील त्याआधारे पुढे धोरणात्मक निर्णय घेतले  जातील.