१८ मार्च रोजी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घऱी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्यानं त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. दरम्यान, या कार्यक्रमात सामिल झालेल्या बडोद्यातील पाच जणांना शोधण्यात यश मिळालं आहे.

बडोद्यातील हे पाज जण दिल्लीतील त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं होतं. त्यानंतर या पाच जणांना शोधण्यात पोलिसांचा यश मिळालं. या पाचही जणांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्या वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
अन्य राज्यातील लोकांनाही लागण

निजामुद्दीन येथील कार्यक्रमामुळे इतर राज्यांमधील लोकांनाही करोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंदमान निकोबार येथील सहा जणांना लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. हे सर्वजण कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यानंतर कोलकातामार्गेत पोर्ट ब्लेअरला परतले होते. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रीनगरमधील ६५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. तर आंध्र प्रदेशातील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या मशिदीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसंच गेल्या एक आठवड्यापासून परिसरात मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.