भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला गैरहजर राहील्याने वडोदरा येथील एका शाळेतील पाच विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याची माहीती समोर आली आहे.
पालक समितीने केलेल्या आरोपानुसार, १५ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते एका स्थानिक मैदानाचे उदघाटन झाले त्यावेळी शालेय विद्यार्थीही उपस्थित होते. या कार्यक्रमाला पाच विद्यार्थ्यांनी दांडी मारली त्यामुळे दुसऱया दिवशी शालेय प्रशासनाने या विद्यार्थ्यांना सरळ शाळेतून काढून टाकले. सदर शाळेतील पालक समितीने शाळेवर आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे केल्याचेही समजते.
परंतु, शाळेतून काढून टाकण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळे विरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही. शाळेचा खाडा केला म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना काढून टाकल्याचे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. तर, तेथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा शाळेने तडकाफडकी घेतलेला निर्णय शाळेचा खाडा केला म्हणून नाही, तर मोदींच्या सभेला दांडी मारली म्हणून त्यांना शाळेतून बेदखल करण्यात आले असल्याचे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे.