22 February 2019

News Flash

‘व्हॅलेंटाइन डे’ला बजरंग दलाकडून देशभरात विरोध, नागपूरात ‘इशारा रॅली’

जोडप्यांची लग्ने लावून देण्याची धमकी

नागपूर शहरामधून 'इशारा रॅली' काढण्यात आली

दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘व्हॅलेंटाइन डे’ला बजरंग दलाने विरोध केला आहे. यंदाही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून देशभरातील काही शहरांमध्ये आंदोलनही केले. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये बजरंग दलाने ‘व्हॅलेंटाइन डे’विरोधी रॅलीचे आयोजन केले. जर ‘व्हॅलेंटाइन डे’ समर्थकांना हा दिवस साजरा करण्याचा हक्क आहे तर आम्हालाही आमची संस्कृती जपण्याचा हक्क आहे असे मत नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

नागपूरमध्ये विरोध आणि ‘इशारा रॅली’

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये बजरंग दलाने सकाळपासूनच ‘व्हॅलेंटाइन डे’विरोधात आंदोलन सुरु करत शहरामधून रॅली काढली. या रॅलीला ‘इशारा रॅली’ असे नाव देण्यात आले आहे. जर रस्त्यात एखादे जोडपे भटकताना सापडले तर आम्ही त्यांचे लग्न लावून देऊ अशी धमकीही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली. ही केवळ धमकी नसून आम्ही त्यासाठी पंडीतही तयार ठेवले असल्याचेही या कार्यकर्त्यांनी सांगितले. काल म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’च्या एक दिवस आधी या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून उद्या पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करण्यासंदर्भात सुचना केल्या होत्या.

अहमदाबादपासून ते हैदराबादपर्यंत विरोध

नागपूरबरोबरच देशभरामध्ये कालपासूनच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अनेक हॉटेल्स आणि पब्सला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करण्याची इशारा वजा धमक्या देण्यास सुरुवात केली. हैदराबादमधील पब आणि हॉटेल मलाकांना निवेदन देऊन ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये कोणत्याही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करु नये असा इशारा देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमधील अहमदाबादमध्ये तर परवापासूनच ‘व्हॅलेंटाइन डे’विरोधी पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर ‘व्हॅलेंटाइन डे’चा हा प्रेमाचा दिवस लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे बजरंग दलाने सांगितले होते.

अहमदाबादमधील आंदोलन

हैदराबादमधील आंदोलन

काय होते या पोस्टर्समध्ये

अहमदाबादमध्ये जागोजागी लावण्यात आलेल्या या पोस्टर्समध्ये बुर्ख्याने अर्धा झाकलेल्या चेहऱ्यामध्ये एक मुलगी दाखवण्यात आली आहे. हिंदू मुलींनो सावध व्हा, ‘व्हॅलेंटाइन डे’ला नाही म्हणा! असा मजकूर या पोस्टरवर लिहण्यात आला असून पोस्टरच्या खालील बाजूस बजरंग दलाचे नाव टाकण्यात आले आहे. हे पोस्टर प्रामुख्याने शहरांमधील मोठ्या कॉलेजसच्या बाहेर लावण्यात आले आहेत.

तामिळनाडूही विरोध

तामिळनाडूमधील कोइम्बतूरमधील हिंदूत्वावादी संघटनांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध करताना हा दिवस साजरा न करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार ‘व्हॅलेंटाइन डे’ हा भारतीय संस्कृती आणि परंपरांविरोधात असल्याचे हिंदू मक्काल काटची संस्थेच्या अर्जून संपत यांनी सांगितले आहे.

चेन्नईमध्ये आंदोलनकांनी कुत्रा आणि गाढवाचे लग्न लावून दिले

First Published on February 14, 2018 1:33 pm

Web Title: valentines day bajrang dal issue threats to couples hold ishara rally in nagpur and other cities of india