लाघवी बोलणे, हसतमुख काहीसा मिश्कील स्वभाव अशी चरित्र नायकांच्या एरव्हीच्या चौकटीत न बसणारी अशी प्रतिमा घेऊन हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे सोमवारी लंडन येथे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेली काही वर्षे हिंदी चित्रपटांपासून सईद जाफरी दूर होते. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.