उत्तर प्रदेशच्या विधानसभेमधील फोटोगॅलरीमध्ये लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फोटोवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे आमदार दिपत सिंग यांनी सावरकरांचा फोटो विधानसभेच्या कक्षामध्ये लावण्यावरुन आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून हा फोटो काढण्याची मागणी केली आहे.

“सावरकरांचा फोटो भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या पंक्तीत लावण्यात आला आहे. ब्रिटिश सम्राज्याने केलेल्या अनेक अत्याचार सहन करुनही त्यांच्यासमोर न झुकलेल्या आणि हाल अपेष्टा सहन करुनही भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेल्या या स्वातंत्र्यसेनेनींच्या पंक्तीमध्ये सावकरांचा फोटो लावणे हा या महान व्यक्तींचा अपमान आहे,” असं सिंग यांनी अध्यक्ष रमेश यादव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. मंगळवारीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या फोटोचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर लगेचच सिंग यांनी हे पत्र लिहिलं आहे.

सिंग यांनी सावरकरांचा फोटो काढून तो भाजपाच्या कार्यालयामध्ये लावावा असंही सिंग यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये अध्यक्षांनी मुख्य सचिवांना लक्ष घालण्याचे आदेश दिल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. हे प्रकरण पूर्णपणे समजून घेत यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश अध्यक्षांनी मुख्य सचिवांना दिल्याचे समजते.

याच संदर्भात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, देशातील तरुणांनामध्ये यासंदर्भात चर्चा घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासंदर्भात तरुणांमध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण लढलं आणि कोणी यामध्ये योगदान दिलं हे स्पष्ट होईल. तेव्हाच आपण या लढ्यात सहभागी झालेल्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे, असं यादव म्हणाले. मात्र असं असतानाच दुसरीकडे अनेक आरोप, कागदपत्र आणि गोष्टी सांगितल्या जातात ज्यामुळे संभ्रम निर्माण होतो, असंही यादव यांनी म्हटलं आहे.

सावरकरांच्या या फोटोचे अनावरण करताना योगी आदित्यनाथ यांनी सावरकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी होते तसेच सावरकरांच्या व्यक्तीमत्वामुळे आजही भारतीयांना प्रेरणा मिळत असल्याचं म्हटलं होतं. सावकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या योगदानावरुन भाजपा आणि काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांमध्ये मतमतांतरे आहेत. भाजपा साकरकरांना हिंदुत्ववादी आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाची भूमिका पार पाडणारे स्वातंत्र्यसेनानी असल्याचे सांगते. तर काँग्रेस आणि विरोधी पक्ष सावरकरांचा संबंध गांधी हत्येशी जोडताना दिसतात.