वाहन उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी सरकार ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ आणणार आहे. ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ म्हणजे ठराविक काळानंतर वाहन मालकाला त्याची गाडी वापरता येणार नाही. ते वाहन मोडीत निघेल. मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी यांनी हे विधान केले. ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’मुळे वाहनांची विक्री वाढेल तसेच भारत वाहननिर्मिती क्षेत्रात जगातील अग्रगण्य बाजारपेठ बनेल” असे गडकरींचे म्हणणे आहे.

भारतातील वाहन उद्योग क्षेत्र सध्या मोठया मंदीचा सामना करत आहे. वाहनांची विक्री मोठया प्रमाणात घटली आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांना त्यांच्या कारखान्यातील उत्पादन काही दिवसांसाठी बंद ठेवावे लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपात, विक्री दालनांची संख्या कमी करणे, उत्पादनाला कात्री लावल्यानंतर आता देशातील वाहन उद्योगांनी प्रकल्पच काही दिवसांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचे धोरण कंपन्यांनी अनुसरले आहे.

वाहन उद्योग क्षेत्राने जुलैमध्येमध्ये १९ वर्षांतील नीचांकी विक्री नोंदविली आहे. चढा कर भार, अनिवार्य विमा तसेच इंजिनासाठी अद्ययावतता यामुळे किमती वाढल्याने मागील सलग नऊ महिन्यात विविध गटांतील वाहन विक्री रोडावली आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच्या बाजारातील मागणीअभावी वाहन निर्मिती कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे.