देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांचा विजय झाला आहे. ११ ऑगस्टला ते शपथ घेतील, शनिवारी सकाळी १० ते ५ या वेळेत उपराष्ट्रपतीपदासाठीचं मतदान पार पडलं, ज्यानंतर व्यंकय्या नायडू यांचा विजय जाहीर करण्यात आला. व्यंकय्या नायडू हे एनडीएचे उमेदवार होते.

एनडीएकडे असलेल्या बहुमतामुळे व्यंकय्या नायडूच उपराष्ट्रपती होणार हे निश्चित झालं होतं आणि निकालानंतरही हेच चित्र बघायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यंकय्या नायडू यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. व्यंकय्या नायडू जिंकणार हे मला माहित होतं आज त्यांच्यासोबत केलेली अनेक कामं आठवत आहेत या आशयाचा ट्विट करत पंतप्रधानांनी नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच उपराष्ट्रपती म्हणून नायडू खूप चांगलं काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही व्यंकय्या नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर नितीशकुमार यांनी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यूपीएच्या गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर बिहारमध्ये जे काही घडलं ते देशानं पाहिलं आहे भाजपसोबत जदयूनं हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता नितीशकुमार यांनीही नायडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही ट्विटरवरून व्यंकय्या नायडू यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच भाजपच्या इतर दिग्गज नेत्यांच्याही प्रतिक्रिया ट्विटरवर पडण्यास सुरूवात झाली आहे.

व्यंकय्या नायडू यांच्या विजयानंतर आंध्रप्रदेशात दिवाळी सुरू झाली आहे. कमळ असलेला केक कापून भाजपच्या कार्यकर्त्यांनी नायडू यांचा विजय साजरा केला आहे तसंच फटाक्यांची आतिषबाजीही केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. नायडू चांगलं काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

एवढंच नाही तर व्यंकय्या नायडू यांचे प्रतिस्पर्धी आणि यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांनीही नायडू यांचं अभिनंदन केलं आहे.