भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच शुभ वार्ता समजणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, भारत-पाकिस्तानच्या संघर्षाबाबत एक शुभ वार्ता समजेल. हा तणाव लवकरच निवळेल, अशी आशा आहे, असे ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दि. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यापासून भारत-पाक संबंधात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, चीनसमवेत अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली आहे. भारताने मंगळवारी पहाटेच्या सुमारास खैबरपख्तूनख्वामधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ले करून ते नष्ट केले होते.

भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय सैनिकांच्या तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यामुळे या तणावात आणखी वाढ झाली. यावेळी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचे एफ १६ हे विमान पाडले होते. त्याचबरोबर इतर विमानांना पिटाळून लावले होते. कोसळलेल्या विमानोच अवशेष पीओकेत पडले आहेत. याचदरम्यान भारताचे मिग २१ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. अभिनंदन यांना सुरक्षितपणे त्वरीत सोडावे अशी मागणी भारताने इस्लामाबादला केली आहे.