उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशातील सध्याच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीत सहिष्णूता आणि धर्मनिरपेक्षता आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रीय विधी महाविद्यालयाच्या २५ व्या दिक्षांत सोहळ्यातील भाषणात बोलताना म्हटले. धर्मनिरपेक्षतेचे मूळ सिद्धांत पुनर्जीवित करुन त्यांची अंमलबजावणी सामजिक जीवनात होणे अतिशय आवश्यक असल्याचे अन्सारी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले.

‘धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतांची प्रत्यक्ष आयुष्यात अंमलबजावणी करण्याचे आव्हान आता समाजासमोर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दादेखील आता मोठा आव्हानात्मक झाला आहे. भारतीय समाजात सहिष्णूता दिसायला हवी आणि ही सहिष्णूता स्वीकाराली जायला हवी,’ असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भाषणात बोलताना म्हटले. ‘सुदृढ लोकशाहीसाठी सर्वसमावेशकता आणि सहिष्णूता आवश्यक आहे. यासोबतच सहिष्णूता स्वीकारार्ह असणे अतिशय गरजेचे आहे,’ असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

‘आपण इतर धर्मांबद्दल केवळ सहिष्णूच असायला नको, तर त्याबद्दल सकारात्मक असायला हवे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. प्रत्येक धर्म हा सत्यावर आधारित आहे, अशीही विवेकानंदांची शिकवण होती,’ असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी त्यांच्या भाषणात म्हटले. ‘वृथा राष्ट्रवाद असुरक्षिततेचे लक्षण आहे. यामुळे अहिष्णूता आणि दांभिक देशभक्तीला बळ मिळते,’ अशा शब्दांमध्ये अन्सारी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.

हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. ११ ऑगस्टला व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गोपाळ कृष्ण गांधी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. नायडू यांच्या विजयामुळे पहिल्यांदाच देशाच्या तीन सर्वोच्च पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान झाले आहेत.