अमेरिकेने शुक्रवारी पहाटे बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार मारले. त्यामुळे आखातात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान या हल्ल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले क्षण इराकमधील अलहद टीव्हीने जारी केलं आहे.

नक्की काय घडलं?

इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी असणाऱ्या सुलेमानीसहीत काही लष्करी अधिकाऱ्यांचा ताफा इराकची राजधानी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होता. याच ताफ्यावर अमेरिकेने ड्रोनच्या माध्यमातून हवाईहल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल असणाऱ्या सुलेमानीचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सुलेमानीसह अन्य आठ जण ठार झाले. याच हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेज आता अलहद टीव्हीने जारी केलं आहे. या फुटेजमध्ये अचानक विमातळावर मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे.

युद्धजन्य वातावरण…

अमेरिका – इराणमधील संबंध गेले वर्षभर तणावपूर्ण होते. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध लादून त्याची कोंडी केली होती. या दोन देशांतील तणावात शुक्रवारी पहाटे अमेरिकेने सुलेमानीला ठार केल्याने तेल ओतले गेले आहे. चवताळलेल्या इराणने सुलेमानीच्या हत्येचा सूड घेण्याचा इशारा दिल्याने आखातात युद्धजन्य तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने धोकादायक पाऊल उचलले असून त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे इराणने ठणकावले आहे.

अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील: खामेनी

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आक्रमक झाले असून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. अमेरिकेला आपल्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील. सुलेमानीच्या रक्ताने ज्यांचे हात माखले आहेत, त्यांच्यावर सूड घेण्यात येईल. आम्ही सुलेमानीच्याच मार्गावर चालत राहू. या पवित्र लढाईमध्ये जय आमचाच होईल, असे खामेनी यांनी सरकारी वाहिनीवरील संदेशात म्हटले आहे.

सुलेमानी कोण होते

  • इराणचे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार..
    इराणमधील अत्यंत लोकप्रिय असामी असा लौकिक असलेले सुलेमानी हा मध्य पूर्वेतील शक्तिशाली जनरल होते आणि इराणच्या अध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार म्हणूनही त्याचे नाव अनेकदा चर्चेत होते. इराणच्या कुड्स दलाच्या प्रमुखपदाची धुरा दीर्घकाळ सांभाळली होती. अमेरिका आणि त्यांचे मित्र देश सुलेमानीकडे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहात होते.
  • इराकविरोधातील कारवायांमध्ये सहभाग..
    इराणच्या कर्मन प्रांतात ११ मार्च १९५७ रोजी जन्मलेला कासिम सुलेमानी १९८० च्या दशकात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स या सेनेत सामील झाला. १९८० ते १९८८ या काळात झालेल्या इराण-इराक युद्धाच्या वेळी सुलेमानीने साराल्लाहच्या ४१व्या तुकडीचे नेतृत्व केले होते. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती. इराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये सुलेमानीचा सहभाग होता.
  • ऑर्डर ऑफ जोल्फाकार पुरस्कार..
    ऑपरेशन डॉन ८, कर्बाला ४ आणि कर्बाला ५ या ऑपरेशनमध्येही सुलेमानीचा सहभाग होता. त्याचप्रमाणे लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये इराणने केलेल्या कारवाया सुलेमानीच्यामार्फत करण्यात आल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मार्च २०१९ मध्ये सुलेमानीला इराणने ऑर्डर ऑफ जोल्फाकार हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. १९७९ नंतर हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला इराणी ठरला होता.
  • त्यांचा काटा काढण्याचा अनेकदा प्रयत्न..
    सीरिया आणि इराक यांच्यातील युद्धात सुलेमानीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यादरम्यान मध्य पूर्वेत इराणचे वर्चस्व वाढू नये यासाठी सौदी अरेबिया आणि इस्राएल प्रयत्न करीत होते, तर दुसरीकडे अमेरिकाही इराणविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र त्याही स्थितीत इराणचे वर्चस्व कायम ठेवण्यात सुलेमानीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या तीनही देशांमधील संस्थांनी सुलेमानीचा काटा काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, मात्र त्यामधून ते बचावले होते.
  • अफाट लोकप्रियता..
    इराकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या उच्चपदस्थ चर्चेत सुलेमानीचा थेट सहभाग होता, हे उघड झाल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. तेव्हापासून त्याचा इराकमध्ये राबता होता. ‘इराणपोल’ आणि मेरिलॅण्ड विद्यापीठाने २०१८ मध्ये एक पाहणी अहवाल जारी केला, त्यामधून सुलेमानीच्या लोकप्रियतेचे प्रमाण ८३ टक्के असल्याचे स्पष्ट झाले होते. सुलेमानीने याबाबतीत अध्यक्ष हसन रौहानी आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरिफ यांना मागे टाकले होते.