विजय मल्ल्याच्या फ्रान्समधल्या १४ कोटींची मालमत्ता इडीने म्हणजेच अमबलजावणी संचलनालयाने सांगितल्यानंतर फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. स्टेट बँकेसह इतर बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्याची आता फ्रान्समधली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.  युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. आम्ही फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे असं ईडीने म्हटलं आहे.

विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH या ठिकाणी असलेली मालमत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. विजय मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. जानेवारी २०१९ मध्ये विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते. मार्च २०१९ पासून तो लंडनमध्ये राहतो आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करतं आहे.

ब्रिटनमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातला खटला सुरु आहे. याआधी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयाला विजय मल्ल्याच्या वकिलांनी आव्हान दिलं. तसंच विजय मल्ल्याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विनंती केली आहे. भारत सरकारने याप्रकरणी विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावं अशी विनंती केली आहे. किंगफिशर एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून सुमारे ७ हजार कोटींचं कर्ज देणअयात आलं होतं. व्याज आणि दंड यांची रक्कम मिळून कर्जाचा हा डोंगर १२ हजार कोटींपर्यंत वाढला आहे. दरम्यान विजय मल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर कर्ज बुडवल्याचाही आरोप फेटाळून लावला होता.