भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा उल्लेख कोणी पाकिस्तानी असा करत असेल तर त्याविरोधात कायदा आणावा अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली. ज्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे नेते विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहूच नये, पाकिस्तान किंवा बांगलादेशात निघून जावे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. जे लोक वंदे मातरमचा सन्मान ठेवत नाहीत. पाकिस्तानचे झेंडे भारतात फडकवतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे.

फाळणीच्या वेळी लोकसंख्येच्या आधारावर फाळणी करण्यात आली आणि मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तान वेगळा करण्यात आला. अशा स्थितीत भारतात मुस्लिमांनी राहण्याची गरजच काय? त्यांनी खुशाल पाकिस्तान किंवा बांगलादेशात निघून जावे त्यांचे भारतात काय काम? असे प्रश्न विनय कटियार यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केले आहेत.

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद व्हावी अशी मागणी लोकसभेत केली होती. भारता राहणाऱ्या मुस्लिमांसाठी कठोर कायदा करण्यात यावा आणि जी व्यक्ती हा कायदा मोडेल त्या व्यक्तीला असे वक्तव्य केल्याबद्दल दंड किंवा किमान तीन वर्षांचा कारवास अशी शिक्षा देण्याची तरतूद असावी असेही सुचवले होते. मात्र ओवेसी यांच्या याच वक्तव्यावर कटियार यांनी त्यांना प्रत्युत्तर देत इथल्या मुस्लिमांनी पाकिस्तानात निघून जावे असे म्हटले आहे.

मंगळवारीच ताजमहालाबाबतही कटियार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ताज महोत्सव म्हणा की तेज महोत्सव ते हिंदूंचे मंदिरच आहे नंतर तिथे कबर बांधली गेली असा दावा कटियार यांनी केला. त्यापाठोपाठ आता त्यांनी देशातल्या मुस्लिमांनी भारत सोडावा असेही म्हटले आहे.