टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता झालेले माजी दूरसंचार मंत्री ए. राज यांनी त्यांच्या ‘टूजी सागा अनफोल्डस’ पुस्तकातून संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकला. या पुस्तकात त्यांनी ‘कॅग’चे तत्कालीन प्रमुख विनोद राय आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वत:हून दूरसंचार धोरणाला मंजूरी दिली असताना ते शांत का राहिले? टूजी स्पेक्ट्रम वाटपात घोटाळा झाला हा आरोप करण्यामागे विनोद राय यांचा कोणता अन्य हेतू होता का?, असे अनेक प्रश्न राजा यांनी या पुस्तकात उपस्थित केले आहेत.

टूजी घोटाळ्याचा आरोप देशातील प्रशासकीय व्यवस्थेचे पावित्र्य कलंकित करण्याचा लाजिरवाणा प्रकार होता. दूरसंचार क्षेत्रातील लॉबीज पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकत असल्याचा गैरप्रचार त्यावेळी करण्यात आला. तसेच मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्पेक्ट्रम वाटपाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली होती. स्पेक्ट्रम मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही मी त्यांना सांगितले होते. तेव्हा पंतप्रधानांनीच नव्या कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटप करण्याला हिरवा कंदील दाखवला होता, असा दावा ए. राजा यांनी पुस्तकात केला आहे. घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर माझ्या निर्णयांची पाठराखण न करता यूपीए सरकार, विशेषत: पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाळगलेले मौन हे संपूर्ण देशाच्या सदसदविवेकबुद्धीने शांत बसण्यासारखे होते, असे सांगत मनमोहन सिंग यांच्या भूमिकेवर काहीशी नाराजी व्यक्त केली. तसेच सीबीआयकडून दूरसंचार कार्यालय आणि टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यांबद्दल मनमोहन सिंग यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना विश्वास ठेवायला कठीण जाईल पण २२ ऑक्टोबर २००९ रोजी मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात भेटलो तेव्हा त्यांनी मला या छाप्यांबद्दल काहीच माहिती नसल्याचे राजा यांनी सांगितले.

याशिवाय, राजा यांनी पुस्तकात तत्कालीन ‘कॅग’प्रमुख विनोद राय यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळी कॅग एखाद्या डोळे बंद करून बसलेल्या मांजराप्रमाणे वागत होती. आपले डोळे बंद आहेत म्हणजे जगात सर्वत्र अंधार आहे, असे त्यांचे वर्तन होते. विनोद राय यांनी सनसनाटी पद्धतीने माहिती पसरवून आणि स्पेक्ट्रम वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप करून स्वत:चा वैयक्तिक हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. सरकारचे १.७५ लाख कोटींचे नुकसान झाले हा त्यांनी वर्तवलेला अंदाज खोटा ठरला. मात्र, ही गोष्ट लोकांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्याचा फटका मला बसला, असे राजा यांनी पुस्तकात म्हटले आहे.