नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटना निवडणुकीत डाव्या आघाडीने बाजी मारल्यानंतर रा. स्व. संघाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डाव्यांची एआयएसए या संघटनांच्या समर्थकात सोमवारी मारामारी झाली. युनायटेड फ्रंट ऑफ लेफ्ट स्टुडंट्स ग्रुप या आघाडीने जेएनयूच्या निवडणुकीत सर्व चार जागा रविवारी जिंकल्या होत्या. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांचा बऱ्याच मताधिक्याने पराभव झाला होता.

जेएनयूएसयूचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन साई बालाजी यांनी असा आरोप केला की, सोमवारी सकाळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली.

अभाविपचे कार्यकर्ते ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजे एआयएसए या संघटनेच्या सदस्यांना धक्काबुक्की करीत असताना मी व इतर काहींनी हस्तक्षेप केला त्यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला.

बालाजी यांनी  असा आरोप केला की, पोलीस नियंत्रण कक्षाची व्हॅन त्यांना परिसरातून बाहेर नेत असतानाही त्यांनी हल्ले केले. अभाविपने असा दावा केला की, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजे एआयएसए या संघटनेच्या सदस्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. अभाविप व एआयएसए या दोघा संघटनांनी वसंत कुंज पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

पोलीस उपायुक्त देवेंदर आर्य यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला पहाटे तीन वाजता फोन आला. त्यानंतर आम्ही विद्यापीठ अधिकारी, विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली. वसंत कुंज पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करण्यात आल्या असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. जेएनयू परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एआयएसए संघटनेचे बालाजी  यांना २१६१ मते मिळाली होती त्यांनी भाजपचे  ललित पांडे याचा ११७९ मतांनी पराभव केला होता. एआयएसए , स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यांनी एकत्र येऊन ‘युनायटडे लेफ्ट’ या आघाडीअंतर्गत निवडणूक लढवली होती.