संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यपालांना निवदेनही सादर केलं आहे.

”निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात २४ तासांत ९ लोकांचा मृत्यू झाला असून, राज्यात भीतीचं वातावरण आहे. सत्ताधारी पक्ष हातावर हात ठेवून बसला आहे. पोलीस निष्क्रय आहेत. आम्ही राज्यपालांकडे निवेदन घेऊन आलो होतो, त्यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि आश्वासन दिलं.” अशी माहिती पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली आहे.

पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजपा कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञात आज लोकांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले. “टीएमसीच्या उपवद्रवींनी माझे दुकान लुटले. येथे कमीतकमी १० बॉम्ब फेकले गेले,” असं एका स्थानिकाने सांगितले.

बंगालमध्ये निकाल लागताच हिंसाचार; भाजपा, तृणमूलच्या कार्यकर्त्यांसह ४ जणांचा मृत्यू

दरम्यान, प्रचारादरम्यान हिंसाचाराचं गालबोट लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागताच हिंसाचाराचा उद्रेक होताना दिसत आहे. निकाल लागल्यापासून राज्यातील विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.  नंदीग्राममध्येही हिंसक घटना घडली असून, नंदीग्राम भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.