भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारलं आहे. हे चॅलेंज स्वीकारतानाच कोहलीने पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिलं आहे.

क्रीडा मंत्री राठोड यांनी फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता.

त्यांचं हे चॅलेंज कोहलीने पूर्ण करुन स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने, ‘मी राज्यवर्धन राठोड सरांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे, आणि आता मी माझी पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांना चॅलेंज करतोय’, असं  ट्वीट केलं आहे.

अॅथेंस ऑलम्पिक २००४ मध्ये रजत पदक विजेता आणि लष्करात कर्नल राहिलेल्या राठोड यांनी कोहली, ऑलम्पिक बॅडमिंटन पदक विजेती खेळाडू सायना नेहवाल आणि ऋितिक रोशन यांना टॅग केलं होतं.