प्रचारात समाजमाध्यमांचे महत्त्व सर्वच पक्षांकडून अधोरेखित

लोकसभा निवडणुकीत  अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यावेळची निवडणूक आभासी जगातच मोठय़ा प्रमाणात लढवली जाणार आहे. प्रत्येक पक्षाच्या समाजमाध्यम विभागांनी  त्यासाठी कंबर कसली आहे. २०१४ मध्ये भाजपने समाजमाध्यमांचा वापर निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर केला होता, पण आता २०१९ मध्ये काँग्रेसही ‘सायबर योध्द्यां’सह सज्ज आहे.

अनेक कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना माहितीचे विश्लेषणही शिकवण्यात आले आहे. काँग्रेस व भाजपच नव्हे तर आम आदमी पक्ष व माकप हे पक्षही समाजमाध्यमातून निवडणूक लढण्यास सज्ज आहेत. काँग्रेसचे डिजिटल अस्तित्व वाढले असून प्रत्येक राज्यात डिजिटल प्रचार कक्ष सुरू करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या समाजमाध्यम विभाग प्रमुख दिव्या स्पंदना यांनी सांगितले की, प्रत्येक राज्यात समाजमाध्यम कक्ष स्थापन  केले असून आम्ही प्रत्येकाशी जोडले गेलो आहोत. प्रत्येकाच्या मोबाईलवर आम्ही माहिती पाठवत आहोत. गेल्या आठवडय़ात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्ट टाकली होती त्यात पक्षाचा संपर्क सुधारण्यासाठी लोकांना विशिष्ट अर्ज भरण्याचे आवाहन केले होते. पक्षाने व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सर्वाना दिला असून लोक त्याच्याशी जोडले जातील.

समाजमाध्यमांची जादू प्रथम भाजपला समजली त्यांचे डिजिटल अवकाशातील स्थान अजून कायम असून विरोधकांचे हल्ले परतवण्यास ते सज्ज आहेत. १२ लाख कार्यकर्ते यात काम करीत आहेत, असे भाजपचे माहिती व तंत्रज्ञान प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले. आमचे कार्यकर्ते प्रशिक्षित आहेत. त्यांना राजकीय संज्ञापन शिकवलेले आहे.

यावेळी काँग्रेस भाजपला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज आहे त्यासाठी दिव्या स्पंदना यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ऑनलाईन लोकप्रियता वाढली आहे.

काँग्रेसशिवाय  माकपही समाजमाध्यमांवर अस्तित्व दाखवत आहे. त्यांचे समाजमाध्यम समन्वयक प्रांजल यांनी सांगितले की, भाजपचे आव्हान समाजमाध्यमांवरच मोडून काढण्याचा प्रयत्न आहे. आम्ही उशिरा सुरुवात केली पण २०१४ मध्येच आम्हाला समाजमाध्यमांचे महत्त्व कळले होते. गेल्या दोन वर्षांत आम्ही बऱ्याच उणिवा भरून काढल्या आहेत.  केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडूत आमचे सायबर सैन्य सज्ज आहे असे ते सांगतात.

आम आदमी पक्षाचे समाजमाध्यम धोरणकार अंकित लाल यांनी सांगितले की, आम्ही भाजपसारखे लपूनछपून काही करीत नाही. आमच्याकडे सायबर सैन्य बरेच आहे. माहितीचे विश्लेषणही सुरू आहे. कार्यकर्ते व मतदान यांच्याशी संपर्क सुरू आहे. काँग्रेसचे माहिती विश्लेषण प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी सांगितले की,  पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी युक्तया केल्या जात आहेत. प्रोजेक्ट शक्ती हा त्याचाच भाग आहे. माहिती विश्लेषण कक्ष सुरू करणे हे अवघड काम असते, पण त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. भाजपचे मालवीय यांनी सांगितले की, निवडणूक माहितीचा अर्थ लावणे हे निवडणुकीच्या राजकारणात नवीन नाही, पण आता माहितीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचबरोबर माहितीचे सखोल विश्लेषण गरजेचे आहे.

भारतातील समाजमाध्यम स्थिती

  • इंटरनेट वापरकर्ते ४६२.१२ दशलक्ष
  • समाजमाध्यमावर असलेले लोक- २५८.३७ दशलक्ष (२०१९ पर्यंतचा अंदाज)
  • समाजमाध्यमावरील लोक- १६८ दशलक्ष (२०१६ पर्यंत)