केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी आपल्या केंद्रीय सहकाऱयांना बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी फटकारले. आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगून कोणालाही जबाबदारी टाळता येणार नाही. आपण सत्ताधारी आहोत त्यामुळे बोलताना काळजीपूर्वक बोलावे, अशी तंबी राजनाथ यांनी दिली आहे. फरिदाबाद दलित जळीतकांडावर केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनी एखाद्याने कुत्र्याला दगड मारल्यास त्यासाठी सरकारला दोषी ठरवता येऊ शकणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी उत्तर भारतीयांना कायदे तोडायला मजा येते, असे अकलेचे तारे तोडले होते.

सत्ताधारी नेत्यांच्या या बेताल वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ यांनी आपल्या नेत्यांना कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देताना अथवा बोलताना सजग राहायला हवे, असा सल्ला दिला आहे. राजनाथ म्हणाले की, व्ही.के.सिंह आणि किरण रिजीजू या दोघांनीही आपापल्या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पण, सत्ताधारी नेत्यांनी कोणतेही वक्तव्य करताना अधिक काळजी घ्यायला हवी, असे मला वाटते. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास होण्याची शक्यता निर्माण होणार नाही या उद्देशाने सहग राहून नेत्यांनी वक्तव्य करावे. आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून प्रकरणापासून स्वत:ला दूर करता येणार नाही, असेही राजनाथ म्हणाले.