केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांची पत्नी भारती सिंह यांना ब्लॅकमेल करून दोन कोटी रूपयांची मागणी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप चौहान असे संशयित व्यक्तीचे नाव असून त्याने फेरबदल केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओ टेपच्या मदतीने भारती सिंह यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. विशेष म्हणजे भारती सिंह यांना या क्लिपमधील संभाषणाबाबत काहीच माहिती नाही.
प्रदीप चौहान हा भारती सिंह यांच्या भाच्याचा मित्र असून तो अवेळी भारती सिंह यांना फोन करून धमकवायचा. तसेच दोन कोटी रूपये न दिल्यास भयंकर परिणामांना सामोरे जावे लागण्याची धमकी देत असत, असे पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
चौहान फोनवरून भारती सिंह यांना व्ही. के. सिंह यांची प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत असत. सहा ऑगस्ट रोजी त्याने यु टयूबवर व्ही. के. सिंह यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. चौहानकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर असून त्यादवारे तो सिंह यांना धमकावयाचा, असे पोलीस अधिकारयाने सांगितले. या प्रकरणी नवी दिल्ली येथील तुघलक रोड पोलीस ठाण्यात १२ ऑगस्ट रोजी भारती सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे.
व्ही. के. सिंह हे २०१२ साली लष्कर प्रमूख म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत ते गाझियाबाद मतदारसंघातून निवडून आले. नरेंद्र मोदी सरकारमध्ये ते परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम पाहतात.