रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सत्ता सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुतीन पुढील वर्षी राष्ट्राध्यपद सोडणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. मास्कोतील राजकीय विश्लेषक वेलेरी सोलोवी यांनी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला बोलताना सांगितलं. आजाराने त्रस्त असलेल्या पुतीन यांच्याकडे त्यांची ३७ वर्षीय प्रेयसी व मुलींकडून राष्ट्राध्यक्षपद सोडण्याचा आग्रह केला जात असल्याचं सोलोवी यांनी म्हटलं आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यातच ते रशियाची सत्ता सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय विश्लेषक वेलेरी सोलोवी यांच्या हवाल्यानं न्यू यॉर्क पोस्टनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आजारामुळे पुतीन यांची ३७ वर्षीय प्रेयसी अलिना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुली त्यांना पद सोडण्यास सांगत असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

वेलेरी सोलोवी म्हणाले,”राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर कुटुंबीयांचा खूप प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटत की, त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडावं. जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देता येईल.” पुतीन यांची प्रेयसी अलिना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुली त्यांच्याकडे राजीनामा देण्याबद्दल आग्रह करत आहेत. पुतीन यांनी यापूर्वीच जानेवारीमध्ये सत्ता दुसऱ्याकडे सुपूर्द करण्याचे संकेत दिलेले आहेत.

सोलोवी म्हणाले,”पुतीन हे पार्किसन आजाराने त्रस्त असावेत. कारण अलिकडेच त्यांच्यामध्ये या आजाराचे लक्षणं दिसून आली होती.” न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे की, पुतीन यांचे पाय थरथरताना आढळून आले होते. हे या आजाराचंच लक्षणं आहे. त्यांच्या बोटांनाही त्रास्त होत आहे. पुतीन हे सध्या ६८ वर्षांचे असून, ७ मे २००० मध्ये त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली होती. त्यांनी रशियाच्या पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे.