आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी स्वच्छ चारित्र्य असणा-याच उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जागतिक कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. विश्व हिंदू परिषद कोणत्याही राजकीय पक्षास किंवा व्यक्तीस समर्थन देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विश्व हिंदू परिषद कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसल्यामुळे कुणालाही पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही ते पुढे म्हणाले. देशातील लाखो हिंदूंचे हित जपण्याच्या दृष्टीने जे कुणी विश्वास दाखवतील त्यांना आमचा पाठिंबा राहिल असे प्रवीण तोगडिया म्हणाले. काही राजकीय पक्ष सत्तेवर आल्यानंतर राम मंदिर, गोहत्या प्रतिबंधक कायदा, समान नागरी कायदा यांसारख्या मुद्द्यांचा त्यांना विसर पडला. त्यामुळे मतदारांनी नेत्यांनी केलेली कामे पाहूनच मतदान करावे. देशातील लाखो हिंदू गरीब अवस्थेत खितपत पडले असून त्यांच्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. तर दुसरीकडे सरकारने अल्पसंख्यांक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी ७०० कोटींची तजवीज केल्याच्या निर्णयावर प्रवीण तोगडियांनी आक्षेप नोंदविला आहे.